महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली साडेसहा लाखांची दारू - sindhudurg crime news

दारूची बेकायदा होत असलेली वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी पथक नेमले आहे. सातार्डामार्गे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार, असे खात्रीलायक वृत्त पथकाच्या हाती लागले होते.

liquor
liquor

By

Published : Feb 9, 2021, 5:35 PM IST

सिंधुदुर्ग - गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन कारवर राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष कृती पथकाने आरोस येथे कारवाई केली. कारवाईत सहा लाख 67 हजार 280 रुपये किमतीची दारू व सहा लाख रुपये किंमतीच्या दोन मोटारी असा एकूण 12 लाख 67 हजार 280 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सापळा रचून करण्यात आली. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत संशयितांनी पलायन केले. गेल्या दोन महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

कार टाकून संशयितांचे पलायन

दारूची बेकायदा होत असलेली वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी पथक नेमले आहे. सातार्डामार्गे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार, असे खात्रीलायक वृत्त पथकाच्या हाती लागले होते. त्यानुसार पथकप्रमुख निरीक्षक व्ही. व्ही. रोकडे यांनी कारवाईसाठी सापळा रचला. रात्री सातार्डा-मळेवाड मार्गावर गस्त ठेवण्यात आली. दरम्यान, मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन कार मळेवाडच्या दिशेने जात असताना त्यांना बॅटरीच्या साहाय्याने थांबण्याचा इशारा दिला; मात्र त्या दोन्ही चालकांनी वाहन न थांबवताच गाडी वळवून आरोसच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला असता अरुंद पुलावर दारू वाहतूक करणाऱ्या दोन्ही गाड्यांचा ताबा सुटल्याने त्या चरात आढळून आल्या. पाहणी केली असता दोन्ही वाहनांच्या दर्शनी व मागील बाजूचे नुकसान झाले होते.

दोन्ही गाड्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके

पथकप्रमुखांनी तपासणी केली असता त्या दोन्ही गाड्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके असल्याचे समोर आले. संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख रोकडे, प्रवीण माने, विश्‍वजीत आभाळे, शिवाजी काळे, अविनाश पाटील, जवान ज्योतिबा पाटील, केतन वझे, अर्जुन कापडे, शाहरुख तडवी, सचिन पैठणकर, सुशील परब, शरद साळुंखे, चालक साजीद मुल्ला, वसंत घुंगरे, संदीप कदम यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details