सिंधुदुर्ग- जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बँका ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) रडारवर आहेत. यात यापूर्वी पुणे आणि सातारा जिल्हा बॅंकेला ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांनतर आता ईडीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठ्याची माहिती मागविली आहे. दरम्यान, आम्हाला नोटीस नाही तर आमच्याकडून केवळ माहिती मागविली असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले आहे.
जिल्हा बँक शिवसेनेच्या ताब्यात
जरंडेश्वर प्रकरणी ईडी अॅक्शन मोडवर आली आहे. सातारा जिल्ह्यातील चिमणगावमधील (ता. कोरेगाव) चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवलेली आहे. त्यांनतर पुणे जिल्हा बॅंकेला नोटीस पाठवली आहे. त्यांनतर आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून ईडीने कर्ज पुरवठ्याची माहिती मागविली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष म्हणतात कर्ज सुरळीत
याबाबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 25 नोव्हेंबर, 2010 रोजी लिलाव झाला आहे. या लिलावात सदर कारखाना खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने थेट अगर सहभागातून कोणेताही कर्ज पुरवठा केला नाही. मे. गुरू कमोडिटीज सर्व्हिसेस प्रा.लि., मुंबई याकंपनीकडून सदरचा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स, पुणे या प्रायव्हेट कंपनीस कारखाना चालविण्यासाठी करार पद्धतीने दिला. सदरच्या कारखान्याची क्षमता 2 हजार 500 मेट्रीक टन प्रतिदिन होती ती वाढून सात हजार मेट्रीक टन प्रतिदिन करण्यासाठीचा प्रस्ताव प्रकल्प मशिनरी आधुनिकरण व सहवीज निर्मीती करण्यासाठी सहभागातून 'कर्ज मिळण्यासाठी बँकेकडे 14 मार्च, 2017 अन्वये कर्ज मागणी केलेली होती. त्यानुसार सदर कारखान्यास सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून बँकेने मशिनरी आधुनिकीकरण व सहवीज निर्मीती व इथेनॉल प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केलेला आहे. बँकेने वितरीत केलेल्या सर्व प्रकारच्या वसुली अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. बँकेने दिलेल्या कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आलेले असून जून, 2021 अखेर कर्जाची वसुली नियमित सुरू असल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'भास्कर जाधव हे सोंगाड्या' म्हणत नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल