पणजी - बनावट कागदपत्रांचा उपयोग करून राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनी बळकावण्यात आल्या असून अशी अनेक प्रकरणे आपल्यासमोर आली आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्यात बनावट कागदपत्रांचा उपयोग करून अनेक ठिकाणी धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे अनेक जमिनी बळकावल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा प्रचंड त्रास होत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे.
किनारी भागात सोन्याच्या दराने जमिनीचा लिलाव -गोव्यात सागरी किनारी भागात परप्रांतीयांकडून सोन्याच्या दराने जमिनीचा लिलाव केला जातो. यात मागेल त्या किमतीला जागा विकत घेण्यासाठी अनेक जण तयार असतात. मात्र सामान्य जनता आपल्या जमिनी विकण्यास तयार नसते. अशावेळी राज्यात कार्यरत असणाऱ्या व राजकीय आशीर्वाद असणाऱ्या लोकांमार्फत बनावट कागदपत्रे बनवून त्या जमिनी परस्पर विकल्या जातात. अशा सर्व विकल्या गेलेल्या जमिनींची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.
विरोधी पक्षनेत्यावर कारवाईचे आदेश -विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यावर नुकतीच नगर नियोजन खात्याकडून बेकायदेशीर जमिनी हस्तगत केल्यामुळे कारवाईचे आदेश देण्यात आले होते. लोबो यांच्याविरोधात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळेच सरकारने सागरी किनारी भागात अशा कागदपत्रांचा वापर करून विकल्या गेलेल्या जमिनींची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.