सिंधुदुर्ग - कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेले पाच महिने शैक्षणिकदृष्ट्या मुलांचे नुकसान होत आहे. शहरी भागात ऑनलाइन पद्धतीने काही प्रमाणात शैक्षणिक अभ्यासक्रम चालू केला आहे. मात्र ग्रामीण भागात साधे मोबाईल नेटवर्क नाही, इंटरनेट सुविधा तर नाहीतच. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सर्वच ग्रामीण भागात पोहचणे सध्यातरी कठीण आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळेबाहेरील शिक्षण केव्हाच सुरू झाले आहे. गावातील उच्चशिक्षित मुले या उपक्रमात सहभागी होऊ लागली आहेत.
शाळेबाहेरील शाळा उपक्रम, सिंधुदुर्ग शाळेबाहेरील शाळा उपक्रम, सिंधुदुर्ग 'शाळेबाहेरील शाळा', सिंधुदुर्गात राबवला जातोय एक आगळा वेगळा उपक्रम सध्याची परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भागातही कोरोनासंसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने 'शाळेबाहेरील शाळा' हा आगळा-वेगळा उपक्रम राबवला आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याची सुरुवात सावंतवाडी तालुक्यातील काहीसे दुर्गम असलेल्या पारपोलीगावातून करण्यात आली आहे. या ठिकाणी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला जात आहे. त्यामुळे सध्या तरी येथील मुलांची शिक्षणाची अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. 'शाळेबाहेरील शाळा' उपक्रम शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सुरुवात करण्यात आली. यासाठी गावातील उच्चशिक्षित व महाविद्यालयीन मुलांची संघटक म्हणून निवड करण्यात आली.
हेही वाचा -सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? पारपोलीच्या शाळेत 30 विद्यार्थी आहेत. त्यांची तुकडी व वाडीनुसार संघटक नेमण्यात आले आहेत. ५ ते ६ मुलांचा गट वाडीवार या संघटकांकडे विभागून देण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 असे दोन तास घरच्या पडवीत हे वर्ग भरवण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतरावर बैठक व्यवस्था व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. रोज कृतीयुक्त अध्ययनावर भर दिला जातो. दरोरोज नवनवीन विषय हाताळले जातात. तसेच त्यांच्याकडून अध्यापन व अध्ययन प्रक्रिया राबवली जाते.
यावेळी शिक्षिका मनीषा धुरी म्हणाल्या की, 'हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. या काळात अभ्यासापासून दूर गेलेली मुले पुन्हा अभ्यासाकडे येत आहेत. पालकांची सभा घेऊन वाडीतील उच्चशिक्षित मुले त्यांना शिकवण्यासाठी घ्यायची, असा निर्णय घेतला. वाडीवर गट नेमले आणि मुलांना शिकवायला सुरवात केली,' असे त्या म्हणाल्या.
महीमा गावकर म्हणाली 'माझ्याकडे सहावीची मुले देण्यात आली आहेत. त्यांना शिकवताना मनाला एक समाधान मिळत आहे. आपल्या हातून या कोरोना महामारीच्या काळात काहीतरी समाजकार्य घडत आहे याचा मला आनंद आहे.' प्रांजली गावकर ही सहावीत शिकणारी विद्यार्थिनी सांगते, 'या उपक्रमात आमची दीदी आम्हाला आमच्या शिक्षकांसारखी शिकवते. या उपक्रमामुळे आम्हाला फायदा होतोय.'
पारपोली शाळेतील शिक्षक दररोज वाडी-वाडीवरील वर्गांना भेट देऊन मुलांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना 'शाळेबाहेरील शाळा' या उपक्रमातून पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न इतरांनाही नक्कीच प्रेरणादायी आहे.
हेही वाचा -राज्यात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार हॉटेल, रेस्टॉरंट