सिंधुदुर्ग – चक्रीवादळ आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी साधन सामुग्रीसह सज्ज रहावे. असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला आज दिले आहेत. महामार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेशही पालकमंत्री सामंत यांनी दिले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथे मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे व वैशाली राजमाने उपस्थित होते.
जिल्ह्यात चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्गाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्याच्या संपर्कासाठी महत्त्वाचे घाट रस्ते सुरू राहण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी.
सरकारी विभागात समन्वय हवा-
घाट मार्गावर कोसळणाऱ्या दरडींबाबतची माहिती तातडीने मिळावी व त्या हटवता याव्यात. तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये, त्वरीत हटवता यावीत यासाठी महसूल, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवावा. शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे.