सिंधुदुर्ग Sindhudurg Crime : धारदार शस्त्रानं अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना देवगड तालुक्यातील मुणगे मसवी रस्त्यावर घडली आहे. प्रसाद परशुराम लोके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसाद लोके याचा खून ( Sindhudurg Crime ) झाल्याचं उघडकीस आल्यानं मिठबांव इथल्या गणेश उत्सवावर शोककळा पसरली आहे. प्रसाद लोकेचा खून करुन मारेकऱ्यांनी त्याच्याच गाडीत टाकून पलायन केल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. यावेळी मारेकऱ्यांनी प्रसाद लोकेच्या गाडीची चावी आणि फोन घेऊन पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चारचाकी गाडी भाड्यानं देण्याचा व्यवसाय :प्रसाद लोके हा मिठबांव इथं महा ई-सेवा केंद्र चालवत असून तो भाड्यानं चारचाकी देण्याचा व्यवसायही करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास प्रसाद लोकेला अज्ञात व्यक्तिचा फोन आला होता. यावेळी त्यांना सकाळी रुग्णाला घेऊन कुडाळ इथं न्यायचं असल्यानं तुझी गाडी घेऊन ये, असं सांगितलं होतं, अशी माहिती प्रसाद लोकेच्या निकटवर्तीयांनी दिली. प्रसाद लोके सोमवारी सकाळी उठून त्याच्या मालकीची वॅगनार कार घेवून भाडं नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. मात्र आपण कोणाचं भाडं घेतलं आहे, त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यानं घरात आई वडील व पत्नीला दिली नसल्यानं याबाबत उलगडा होऊ शकला नसल्याचं त्याच्या निकटवर्तीयानं सांगितलं.
सरपंचाला आला अपघात झाल्याचा फोन :मिठबावचे सरपंच भाई नरे यांना मसवी इथं वॅगनार गाडीचा अपघात झाल्याचा फोन आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले. यावेळी मुणगे मसवी रस्त्यावर वॅगनार गाडीचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत उभी असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यावर ही गाडी मिठबांव इथल्या तात्या लोके यांची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. गाडीमध्ये त्यांनी पाहिलं असता, प्रसाद लोके हा रक्तबंबाळ अवस्थेत उलट्या स्थितीत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्रानं वार केल्याचं दिसल्यानंतर सरपंच भाई नरे यांनी देवगड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं.