सिंधुदुर्ग- शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवली मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धमकी दिली. तुझी आता बदली करतो, तू मला ओळखत नाहीस, मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे आणि माझी गाडी अडवतोस काय? तुझी हिम्मतच कशी झाली. तुला माझा इंगा दाखवतोच, अशा भाषेत गाडीच्या काचा उघडून पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना व्हिडिओत रेकॉर्ड झाली असल्याने खासदार पुत्राचे प्रताप आता जगजाहीर झाले आहेत.
महामार्ग चौपदरीकरणाच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पर्यायी मार्गाने गाडी घेऊन जावी, अशी विनंती कणकवली पोलीस करत होते. याच दरम्यान मालवणहून मुंबईकडे जाण्यासाठी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत आणि त्यांचा एक सहकारी कणकवली चौकात आले. पहिल्या बॅरिकेटवर पोलिसांनी त्यांना पुढे रस्ता बंध असल्याने डाव्या बाजूला वळून पर्यायी मार्गाने पुढे जावे, असे सांगितले. मात्र, ऐकण्याच्या मनस्तीतीत नसलेल्या गीतेशने गाडी भरधाव पळवली तेव्हा पोलिसांनी दुसऱ्या बॅरिकेटवर अडवले. तेव्हा याचा पारा चढला आणि पोलिसांनाच शिवीगाळ करत आता तुला उचलतो, मी खासदार राऊत यांचा मुलगा आहे, तू ओळखत नाहीस, अशी धमकी देत भांडू लागला.