सिंधुदुर्ग - आम्हाला सिंधुदुर्गात नारायण राणेंची दहशत संपवायची आहे आणि येथे विकासाची गंगा आणायची आहे. नारायण राणेंना त्यांचे सर्व बुरुज ढासळताना त्यांच्या नजरेसमोर दिसतील. तसेच नितेश राणे सध्या राजकारणात माणसं गिफ्ट देण्याची नवीन संस्कृती आणताहेत. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेतील स्थान मिळविलीत आणि आज त्याच कार्यकर्त्यांना कुणालातरी गिफ्ट द्यायला निघालात, म्हणजे तुमची संस्कृती कुठे चाललीय हे लक्षात घ्या, अशी टीकाही शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी नितेश राणे यांच्यावर केली.
माणसं भेट म्हणून देणे ही नितेश राणे यांची राजकारणातील नवी संस्कृती - वैभववाडी नगरसेवक शिवसेनेत
ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेतील स्थान मिळविलीत आणि आज त्याच कार्यकर्त्यांना कुणालातरी गिफ्ट द्यायला निघालात, म्हणजे तुमची संस्कृती कुठे चाललीय हे लक्षात घ्या, अशी टीकाही शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी निलेश राणे यांच्यावर केली.
राणे परिवार व्यावसायिक परिवार
नारायण राणे यांचा परिवार हा व्यावसायिक परिवार आहे. हा स्वतःच्या स्वार्थासाठी आणि व्यवसायासाठी आलेला आहे. यांना कुठेही जिल्ह्याच्या विकासासाशी देणं घेणं नाही. वैभववाडीतील जे लोक शिवसेनेत आलेत त्यांना वैभववाडीचे वैभवशाली शहर बनवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
वैभववाडीकरांचा आयुष्यभराचा प्रश्न सुटेल
गेल्या पाच वर्षात वैभववाडी शहराच्या विकासाच्या नावाखाली आमदार नितेश राणे यांनी स्टंटबाजी केली आहे. त्यामुळे कंटाळून वैभववाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या सहा नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना या शहराचा पाणीप्रश्न तातडीने सोडवला जाईल, असा शब्द दिला आहे. लवकरच पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी येतील आणि या कामाची घोषणा करतील. यामुळे वैभववाडीकरांचा आयुष्यभराचा पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही अतुल रावराणे म्हणाले.
राजकारणातील ही नितेश राणेंची नवी संस्कृती
व्हॅलेंटाईन डे चे गिफ्ट म्हणून मी हे नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देत आहे, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले होते. यावर बोलताना अतुल रावराणे म्हणाले. माणसं गिफ्ट देणे ही नितेश राणे यांची राजकारणातील नवी संस्कृती आहे. ज्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण मोठे झालो. पदावर पोहोचलो त्याच लोकांना गिफ्ट म्हणून देणे म्हणजे यांची संस्कृती काय आहे? ते समजून घ्या असेही ते म्हणाले.