सिंधुदुर्ग -आमदार नितेश राणे हे मंगळवारी मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले. नियमाप्रमाणे त्यांनी स्वत:ला सेल्फ क्वॉरेंटाईन करून घेतले. याची बातमी येताच भाजपचे जिल्हा प्रवक्ते आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईहून जिल्ह्यात दाखल झालेले खासदार विनायक राऊत, अतुल रावराणे यांना क्वॉरेंटाईन करण्याची मागणी केली. याला उत्तर देताना सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी संजू परब यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. विनायक राऊत यांनी सर्व तपासण्या करून मतदारसंघात प्रवेश केला असल्याचे सांगत परब यांचा समाचार घेतला. या युद्धात मग भाजपचे प्रवक्ते केतन आजगावकर सामील झाले. त्यांनी विक्रांत सावंतांनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन करू नये. खासदार राऊतांचा तो 'रिपोर्ट' जाहिर करावा, असे आव्हान दिले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत आणि काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष साक्षी वंजारी हेही यामध्ये सामील झाले. सर्वपक्षीय नेत्यांचे हे शाब्दिक युद्धाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेचे नक्कीच मनोरंजन झाले.
कोण कोणास काय म्हणाले?
विनायक राऊत, अतुल रावराणे यांना क्वॉरेंटाईन करा - संजू परब, नगराध्यक्ष सावंतवाडी -
सत्तेचा गैरफायदा घेत खासदार विनायक राऊत आणि सेनेचे पदाधिकारी थेट मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबई हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट आहे. अशा ठिकाणावरून येऊनही स्वतःला क्वॉरेंटाईन करून न घेता खासदार व सेना पदाधिकारी अतुल रावराणे संपूर्ण जिल्हा फिरत आहेत. जिल्हा प्रशासन अशा सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहे. प्रशासनाने तत्परता दाखून विनायक राऊत, अतुल रावराणे यांना क्वॉरेंटाईन करावे, अशी मागणी संजू परब यांनी केली. आमदार नितेश राणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःला होम क्वॉरेंटाईन करून घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. मतांसाठी फिरणारे केसरकर आता मतदारसंघात का नाहीत, असा प्रश्न विचारत आमदार दीपक केसरकर यांनी स्वतःच्या मतदार संघाला वाऱ्यावर सोडले असल्याचे परब म्हणाले.
आवश्यक तपासण्या करूनच खासदार विनायक राऊत जिल्ह्यात आले - विक्रांत सावंत, सेना पदाधिकारी
कोकणातील लोकांशी असलेल्या आत्मीयतेमुळे खासदार विनायक राऊत सिंधुदुर्गात आले आहेत. यासाठी आवश्यक आरोग्य तपासण्या झाल्यानंतरच त्यांना प्रशासनाने सिंधुदुर्गात प्रवेश दिला. त्यामुळे अपुर्या माहितीच्या आधारे सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी लहान तोंडी मोठा घास घेवून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन घडवू नये, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी पत्रकातून दिले.
विक्रांत सावंतांनी आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन करू नये, खासदार राऊतांचा तो ' रिपोर्ट' जाहीर करावा - केतन आजगांवकर, भाजपा पदाधिकारी -
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही ३ हजारांच्या वर गेली आहे. असे असून देखील खासदार विनायक राऊत ६ गाड्यांच्या ताफ्यासह सिंधुदुर्गातील तळगाव या आपल्या गावी आले. विक्रांत सावंत यांच्या म्हणण्याप्रमाणे जर मुंबईवरून ते तपासणी करून आले असतील तर त्यांनी येथे आल्यानंतर किमान ५ दिवस सेल्फ क्वॉरेंटाईन करून घेणे आवश्यक होते. मुंबईहून तपासणी करून आले असतील तर तो रिपोर्ट जाहिर करावा, असे आव्हान सावंतवाडी मंडल भाजपा प्रवक्ते केतन आजगांवकर यांनी दिले. प्रवासात इतरही गावे लागतात, त्यामुळे येथे आल्यानंतर स्वतःला किमान पाच दिवस सेल्फ क्वॉरेंटाईन करून पुन्हा आपली तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सामान्य ज्ञान देखील विक्रांत सावंत यांना नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचा खोचक टोला आजगांवकर यांनी लगावला.
खासदारांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वॉरेंटाईन करा - अशोक सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस
खासदार विनायक राऊत मुंबईतून सहा गाड्यांचा ताफा घेऊन सिंधुदुर्गात आले. या सर्व गाड्या १८ एप्रिलच्या रात्री खासदारांचे निवासस्थान असलेल्या तळगावात दाखल झाल्या. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. मुंबईतून आल्यानंतर किमान ५ दिवस होम क्वॉरेंटाईन राहण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याचा भंग करून राऊत यांचा दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे राऊत यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना होम क्वॉरेंटाईन करावे. तसेच खासदारांसोबत मुंबईतून आलेल्या अन्य वाहनांचा देखील शोध घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केली. मुंबई सारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटवरून जिल्ह्यात आलेल्या खासदारांच्या बेफिकीरपणामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, असेही अशोक सावंत म्हणाले.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत विरोधकांनी राजकारण करू नये - साक्षी वंजारी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष -
खासदार विनायक राऊत यांनी खासदार म्हणून जिल्ह्याची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळेच ते आपला जीव धोक्यात घालून या दोन्ही जिल्ह्याचा दौरा करत आहेत. आपली जबाबदारी समजून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत हे जिल्ह्याचा दौरा करत आहेत. खासदार आणि पालकमंत्री आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे या कठीण परिस्थितीत नको त्या गोष्टीचे राजकारण करू नये. खासदार आणि पालकमंत्री मौजमजा करण्यासाठी दौरा करत नाहीत. त्यामुळे भाजप जिल्हा प्रवक्ते म्हणून असे बालिशपणाचे वक्तव्य करणे संजू परब यांना शोभत नाही. खासदार हे कोणत्याही पक्षाचे असले तरी सध्याची परिस्थिती बघता त्यांच्यावर टीका करणे हे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शोभत नाही, असे मत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी व्यक्त केले.