सिंधुदुर्ग- जिल्ह्यात बुधवारी (दि.29 एप्रिल) एका युवतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या युवतीच्या संपर्कात एकूण 28 व्यक्ती आल्या होत्या. त्यापैकी 16 व्यक्तींना घरी अलगीकरणात ठेवले आहे. तर, 12 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले आहे. या 12 सर्व व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविलेले असून यापैकी सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सहा जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.
सावंतवाडी येथे गरोदर महिलेला सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोनाबाधित असल्याचे समजले. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून या सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच ती स्त्री व तिच्या बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. जनतेने याबाबत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सामाजिक अंतर ठेवून योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 439 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 292 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर 147 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 440 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 408 नमुन्यांचा तपासणी आहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 406 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर उर्वरित 32 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 68 व्यक्ती दाखल असून त्यातील 40 व्यक्ती या डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तर 28 व्यक्ती या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण एक हजार 903 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
आजची जिल्ह्यातील स्थिती अशी -
घरीच अलगीकरण करण्यात आलेले - 292
संस्थात्मक अलगीकरणात असलेले - 147
तपासणीसाठी पाठवलेले एकूण नमुने - 440
अहवाल प्राप्त झालेले नमुने - 408