सिंधुदुर्ग - जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची येथील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथील वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्थ भागाची पाहणी केली.
कणकवली, कुडाळ तालुक्यात केली पाहणी -
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जिल्ह्यात चक्रीवादळाची पाहणी करताना कणकवली तालुक्यातील ओसरगाव या ठिकाणी भेट देत घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याचप्रमाणे झाडे, गोठे व अन्य बागायती यांचे झालेले नुकसान पाहणी करत शेतकऱ्यांना नुकसान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे उपसभापती प्रकाश पारकर तहसीलदार रमेश पवार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्यअधिकारी अवधुत तावडे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. यानंतर आठवले यांनी कुडाळ तालुक्यातील नुकसानीचीही पाहणी केली.