महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात क्वारंटाइन जेलमधून कैद्याचे पलायन

By

Published : May 25, 2021, 8:03 PM IST

न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी प्रमोद मधुकर परब या कैद्याने सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव आयटीआय क्वारंटाइन जेलमधून पलायन केले आहे.

सिंधुदुर्गात क्वारंटाईन जेलमधून कैद्याचे पलायन
सिंधुदुर्गात क्वारंटाईन जेलमधून कैद्याचे पलायन

सिंधुदुर्ग - एका अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी प्रमोद मधुकर परब (वय 51) या कैद्याने सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव आयटीआय क्वारंटाइन जेलमधून पलायन केले आहे. चार पोलीस पहाऱ्याला असताना आणि सोबतच्या तीन कैद्यांनाही थांगपत्ता लागू न देता प्रमोद परब याने पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केला शोध सुरू
सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने परबचा शोध सुरू केला आहे. प्रमोद परब हा कुडाळ तालुक्यातल्या पडवे येथील रहिवासी आहे. कारोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सध्या न्यायालयीन कोठडी मिळणाऱ्या संशयितांना कोलगाव येथील आयटीआयमध्ये तात्पुरत्या निर्माण केलेल्या क्वारंटाइन जेलमध्ये ठेवण्यात येते. त्यानंतर त्यांना तपासणी करून जेलमध्ये आणण्यात येते. एका अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या प्रमोद परब याला कोलगाव येथील क्वारंटाइन जेलमध्ये 15 मेपासून ठेवण्यात आले होते. तेथे दोन खोल्यांमध्ये मिळून आठ संशयित होते. परब याच्यासोबत तीन कैदी होते. पहाऱ्यासाठी चार पोलीस तेथे तैनात होते. मात्र इमारतीच्या बाहेर पोलीस तैनात नव्हते.

ग्रील उचकटून खिडकीतून केले पलायन
इमारतीच्या ग्रीलच्या खिडक्या मजबूत नाहीत. तीच संधी परब याने साधली आणि खिडकीचे ग्रील त्याने उचकटले व इमारतीबाहेर पडून प्रवेशद्वारावरील स्लॅबवर आला. हा भाग उंच असल्याने त्याने खाली उतरण्यासाठी बेडशिटचा वापर केला. तेथून त्याने पलायन केले. त्याच्या पलायनाची कल्पना बाहेर पहाऱ्याला असलेल्या पोलिसांना येताच त्यांनी अन्य तिघा संशयितांना बाजूच्या खोलीत हलवून प्रमोद परबचा शोध सुरू केला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पुन्हा परब याचा शोध सुरू करण्यात आला. सर्वत्र नाकाबंदी करूनही तो सापडला नव्हता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक ही पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details