महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युती साईड इफेक्ट! भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा

नाणार रिफायनरी रद्द केल्याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार

By

Published : Mar 5, 2019, 12:02 AM IST

सिंधुदुर्ग- नाणार रिफायनरी रद्द केल्याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या पदाचाराजीनामा दिला आहे. त्यांनी आज कणकवली येथे पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. जठार हे जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार

जिल्ह्यातील भाजप पक्ष वाढवण्यामध्ये जठार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. प्रमोद जठार यांनी सुरुवातीपासूनच नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले. मित्र पक्ष शिवसेनेचा विरोध असताना देखील वेळोवेळी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका मांडली. रिफायनरी रद्द होण्याची चर्चा सुरू असताना जठार यांनी रिफायनरी समर्थकांना एकत्र करत समर्थनासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. तरी देखील शिवसेनेच्या दबावापुढे भाजपने हा प्रकल्प रद्द केला. त्यानंतर प्रमोद जठार नाराज असल्याचे बोलले जात होते.

त्यांनी अखेर आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडे आपण राजीनामा सोपवणार असल्याचे जठार यांनी सांगितले आहे. जठार यांच्या राजीनाम्याने भाजपला सिंधुदुर्गात खिंडार पडण्याची शक्यता आहे.


दरम्यान, प्रमोद जठार यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला, तरी अद्याप भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. तर दुसरीकडे त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याला देखील विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे जठार यांचा राजीनामा म्हणजे एखादी राजकीय खेळी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details