सिंधुदुर्ग -जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उपरे आणि आमच्यावर लादलेले पालकमंत्री आहेत. त्यामुळेच ते सिंधुदुर्गच्या जनतेवर सूड उगवत आहेत. स्थानिक आमदार पालकमंत्री असते तर जनतेबद्दल सहानुभूती राहिली असती. मुंबईतून निघालेल्या चाकरमान्यांना कोकणात कोठेच अडविले जात नाही. एवढेच नाही तर रत्नागिरीत सुध्दा अडवत नाही. केवळ सिधुदुर्गच्या हद्दीवर खारेपाटण येथेच त्यांना अडवून दोन दोन दिवस तिष्ठत ठेवले जात आहे. 1857 ला प्लेग आला तेव्हा पुणे येथील ब्रिटिश कमिशनर रँड जसा वागला, तसेच पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गात वागत असल्याची टीका माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
"पालकमंत्री उदय सामंत ब्रिटिश कमिशनर रँड सारखे निष्ठूर"
1857 ला प्लेग आला तेव्हा पुणे येथील ब्रिटिश कमिशनर रँड जसा वागला तसेच पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गात वागत असल्याची टीका माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
जठार म्हणाले, कमिशनर रँडचा चाफेकर बंधूंनी ज्या पद्धतीने वध केला त्याच पद्धतीने पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता राजकीय गोंद्या करेल. तसेच आज सिधुदुर्गमध्ये स्वॅब चाचणी होत नाही. त्यासाठी मशिनरीज कमी आहेत त्या खरेदी करण्यासाठीच भाजप आमदारांनी निधी दिला आहे. पडवे एस. एस. पी. एम. हॉस्पिटलमधील लॅब अद्ययावत करून घेणे ही जबाबाबदरी पालकमंत्री यांची होती. मात्र, ती करत नसल्यानेच आम्हाला पुढाकार घ्यावा लागत आहे. येत्या दहा दिवसांत याच पडवे हॉस्पिटलमध्ये स्वॅब टेस्ट लॅब सुरू करणार, त्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा संकल्पच भाजपने केला असल्याचे जठार यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला पाहिजे होता. खरा नेता असता तर जनतेची मदत केली असती. मात्र, हे पालकमंत्री उदय सामंत निष्ठूर वागत आहेत. जर तुम्हाला चाकरमान्यांना अडवायचे होते तर मुंबईतच थांबवा. जिल्ह्यात घेण्यास परवानगी देत नाहीत. हे पालकमंत्री उपरे आहेत. आज केसरकर किंवा नाईक, पालकमंत्री असते तर असा सूड उगवला नसता, असेही जठार यावेळी म्हणाले.
खारेपाटण चेक नाक्यावर दिवसाला 150 गाड्या येतात दोन दिवसांपासून लोक उपाशीपोटी रस्त्यावर आहेत. त्यांची दया पालकमंत्री यांना येत नाही. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव आणून आपल्याला हवे तसे ते वागतात. चाकरमानी यांना परवानगी नसेल तर ते 500 कमी अंतर येतात कसे आणि त्यांना जिल्ह्यात घ्यायचे नाही तर तुमच्या सरकारने त्यांना सिंधुदुर्गपर्यंत पाठवलेच कसे काय? असा संतप्त सवाल जठार यांनी केला आहे.