सिंधुदुर्ग - एकीकडे भारत देश फोरजीवरून फाईव्हजी नेटवर्कची स्वप्न पाहत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी गावे आहेत, जिथे मोबाईल नेटवर्कसाठी रानोमाळ भटकावे लागते. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाची परिस्थिती याहून काही वेगळी नाही. कोरोनामुळे सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागला आहे. पण आंदुर्ले गावात मोबईल टॉवर नसल्याने नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांना रानोमाळ भटकत फिरावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान आणि हाल होत आहेत. आजच्या फोरजी मोबाईल नेटवर्कच्या युगात आंदूर्ले गावातील विद्यार्थी जंगलात, जिथे मोबाईलला रेंज येते अशा ठिकाणी झोपडी बांधून अभ्यास करत आहेत.
ऑनलाईन शिक्षण : मोबाईल नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांची वणवण, झोपडी घालून अभ्यास सुरू - ऑनलाइन शिक्षणात नेटवर्कचा प्रॉब्लेम न्यूज
आंदुर्ले गावात मोबईल टॉवर नसल्याने नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांना रानोमाळ भटकत फिरावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान आणि हाल होत आहेत. आजच्या फोरजी मोबाईल नेटवर्कच्या युगात आंदूर्ले गावातील विद्यार्थी जंगलात, जिथे मोबाईलला रेंज येते अशा ठिकाणी झोपडी बांधून अभ्यास करत आहेत.
तीन ते चार वर्षाचा कालावधी उलटूनही आंदुर्ले गावातील बीएसएनएल टॉवरचा प्रश्न मार्गी न लागल्याने बीएसएनएल सेवा ठप्प आहे. कोरोना पार्श्वभूमीवर नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अभ्यास चालू असल्याने मोबाईल नेटवर्क अभावी व्यावसायिक, शैक्षणिक नुकसान होत आहे. गावात कोणत्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नाही. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी गावातील डोंगरात झोपडी बांधून त्यात अभ्यास करीत आहेत. तर नोकरदार वर्गाला गावच्या सीमावर्ती भागात अथवा डोंगरात जिथे नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
गावात बीएसएनएल कंपनीचा टॉवर असूनही नसल्यासारखा आहे. दूरसंचार विभागाच्या गलथान कारभारामुळे तो टॉवर पुन्हा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. तो पूर्ववत करण्यात यावा यासाठी गावाने आंदोलन करूनही तसेच आमदार, खासदार यांना निवेदने देऊनही याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय या डोंगरावर बिबट्या वाघाचे दर्शन घडत असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मुलांना डोंगरात पाठवणे धोकादायक बनले असल्याचे आंदुर्ले गावाचे ग्रामस्थ तथा आंदुर्ले विकास सोसायटीचे चेअरमन महेश राऊळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी संतोष खानोलकर, सूरज राऊळ, चेतन राऊळ, योगेश राऊळ, अंकित गावडे, राकेश राऊळ, दीपक चव्हाण यांनीही आपली हीच व्यथा बोलून दाखवली.
आंदुर्ले गावातील महेश राऊळ, सतिश राऊळ, प्रफुल राऊळ, रुपेश राऊळ, निनाद राऊळ, कुणाल मुरकर, ओमकार राऊळ, अश्विनी राऊळ, साक्षी राऊळ या सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन आंदुर्लेच्या जंगलात झोपडी उभी केली. गावातील जेष्ठ ग्रामस्थ महेश दत्तात्रय राऊळ यांनी आपल्या डोंगरावरील जमिनीत झोपडीसाठी जागा दिली. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणात ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र गावातील ही स्थिती पाहता आधी गावातली स्थिती सुधारण्यासाठी सरकार काय करणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांचे पालक विचारू लागले आहेत.