महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात शाळा स्थलांतरविरोधात पालक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

By

Published : Apr 2, 2021, 3:59 PM IST

कणकवली शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 3 च्या स्थलांतरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. ही शाळा अन्य कुठे स्थलांतरित करू देणार नाही, अशी भूमिका शाळा बचाव संघर्ष समितीने घेतली आहे

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील कणकवली शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 3 च्या स्थलांतरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. ही शाळा अन्य कुठे स्थलांतरित करू देणार नाही, अशी भूमिका शाळा बचाव संघर्ष समितीने घेतली आहे. ही शाळा स्थलांतरित करून शाळेची जागा लगतच असलेल्या भालचंद्र महाराज संस्थानला देण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाचे आहे. याविरोधात आता विद्यार्थ्यांचे पालक, स्थानिक नागरिक आणि माजी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

अफवांमुळे शाळेच्या पटसंख्येवर होतोय परिणाम

अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक म्हणालेत, जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्येची ही शाळा आहे. या शाळेच्या स्थलांतरनाबाबत वेळोवेळी उठविल्या जाणाऱ्या अफवांमुळे शाळेच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम होत आहे. शाळा स्थलांतरित करण्याबाबत प्रशासनाकडून शाळेचे माजी विद्यार्थी असतील किंवा पालकांची समिती असेल व स्थानिक नागरिक असतील यांची कुणाचीही संमती तसेच कुणाबरोबरही चर्चा करण्यात आलेली नाही. ज्यांना शाळेची जागा हवी आहे, त्या भालचंद्र महाराज संस्थानने देखील कुणाशीही संपर्क साधलेला नाही. उलटपक्षी बाहेरच्या बाहेर आरोप करण्याचे काम केले जात आहे, असे यावेळी नामानंद मोडक म्हणाले.

ही शाळा स्थलांतरित करू देणार नाही

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि शाळा क्रमांक 3 चे माजी विद्यार्थी संजय मालंडकर म्हणालेत, गेली चार वर्षे ही शाळा स्थलांतरित करण्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात आमच्याशी कुणीही चर्चा केली नाही. शाळा स्थलांतरित करताना शाळेसाठी नदीच्या किनाऱ्यावर जागा दिली जाते आहे. या शाळेत आजवर अनेक विद्यार्थी शिकून गेलेत. पुढे त्यातले काही जण डॉक्टर, वकील, न्यायाधीश झालेत. ही शाळा स्थलांतरित करण्यामागे भालचंद्र महाराज मठातील भजन व त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, असे कारण दिले जाते. मात्र, आजवर या शाळेत शिकून-सवरून मोठे झालेल्या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर असा कोणताही त्रास झाल्याचे विद्यार्थ्यांमधून सांगण्यात आलेले नाही. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच ही शाळा स्थलांतरित करू देणार नाही असेही त्यांनी सांगितले.

शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेकडे वळावेत हाही उद्देश आहे

शाळा बचाव समितीचे सदस्य विष्णू राणे यावेळी बोलताना म्हणाले, या शाळेची जागा घेऊन भालचंद्र महाराज देवस्थान संस्थानला या ठिकाणी भक्तनिवास बांधायचे आहे. असे त्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही शाळा स्थलांतरित करून संस्थांनला जागा देताना या शाळेतील विद्यार्थी शहरातील खाजगी शाळेकडे वळावेत असाही एक उद्देश यामागे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. आज या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्यांची मुले शिकत असून त्यांना मोफत शिक्षण या ठिकाणी मिळत आहे. परंतु ही मुले खासगी शाळेत जातील त्यावेळी त्यांना तिथला खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ही शाळा स्थलांतरित करण्यापेक्षा याच ठिकाणी रहावी. शहरातील विद्यार्थ्यांना शहरात मध्यवर्ती शिक्षण घेता यावे. यासाठी आमचा या स्थलांतराला विरोध आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गरीब असूनही आचरेकर यांनी दिली होती शाळेला जागा

स्थानिक नागरिक बाळकृष्ण उर्फ बाबू कांबळे यांनी बोलताना सांगितले, या शाळे करता दलित समाजातील बाबू हरी आचरेकर या हमाली करून स्वतःचे पोट भरणाऱ्या सद्गृहस्थाने जमीन दिली. या ठिकाणी शाळा उभी राहिली आणि दलित समाजासह बहुजन समाजातील मुले मोठ्या संख्येने याठिकाणी शिकू लागली. घरची गरिबी असतानादेखील बाबू हरी आचरेकर यांनी केवळ शाळेसाठी कोणताही मोबदला न घेता ही जागा दिली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा विनामूल्य देताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार आचरेकर यांनी केला. त्यांच्या पश्चात देखील याठिकाणी शाळात रहावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ही जागा भालचंद्र महाराज संस्थानला देण्यापेक्षा या ठिकाणी आजरेकर यांच्या स्मृती जपल्या जाव्यात. या शाळेचे स्थलांतर होऊ नये. अशी आपली धारणा असल्याचे बाबू कांबळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details