सिंधुदुर्ग - चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी देताना भरघोस मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोकणने शिवसेनेला भरभरून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणी माणसाला मदत करताना हात आखडता घेऊ नये, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. जिल्ह्यात दाखल झालेल्या फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रीवादळाच्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार चक्रीवादळग्रस्त भागासाठी भरघोस निधी देणार असल्याचेही सांगितले आहे.
प्रतिक्रिया - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, की मोठ्या प्रमाणावर विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान झालेले आहे. अजूनही जवळ-जवळ एक लाखापेक्षा जास्त घरांची वीज बंद आहे. पुढचे दोन ते चार दिवस अजून याठिकाणी वीज चालू होणार नाही. अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे. यासोबत शेती आणि बागायतीचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. यामध्ये जवळ-जवळ चार हजार हेक्टरमध्ये नुकसान आहे. निसर्ग चक्रीवादळमध्ये सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये अशी घोषणा केली होती. म्हणजे एका झाडा करता 500 रुपये. आताची परिस्थिती पाहता सरकारने अधिक मदत केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
'कोकणने शिवसेनेला भरभरून दिले आहे' आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान या वादळामध्ये झाले आहे. कोरोनाच्या संकटातही हे बागायतदार होरपळून निघाले आहेत. मात्र आंबा बागायतदार यांनी आजपर्यंत कधी कर्ज माफी मागितली नाही. परंतु आता झालेले नुकसान पाहता त्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. तर उद्या मुख्यमंत्री देखील सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या दौऱ्यात कर्जमाफी घोषित केली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. कोकणने शिवसेनेला भरभरून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सरकारनेदेखील कोकणला भरभरून द्यावे अशी अपेक्षा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
'महाराष्ट्राला केंद्राकडूनही मदत मिळणार'
केंद्र सरकार चक्रीवादळग्रस्त भागासाठी भरघोस निधी देणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. गुजरातला वादळ लॅण्डफॉल झाले यामुळे याठिकाणी फार मोठे नुकसान झाले आहे. याकरिता तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भेट दिली आहे. तर देशातील वादळग्रस्त भागाला भरीव निधी ते नक्कीच देतील, असे सांगताना महाराष्ट्राला देखील केंद्र सरकारकडून मदत केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.