सिंधुदुर्ग -'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य सुविधा बळकट करणे याला प्राधान्य देत आहोत. भविष्यातील पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणे, आरोग्य सुविधा वाढवणे, चाचण्यांची क्षमता वाढवण्याचे नियोजन आतापासूनच करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
सिंधुदुर्गात लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाइन लोकार्पण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसी येथे अवघ्या 15 दिवसात बसवण्यात आलेल्या युनायटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्मित 6 केएल क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर हे ऑनलाइन सहभागी झाले होते. तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजित मोहोपात्रा, एमआयडीसीचे क्षेत्रीय संचालक अविनाश रेवणकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युनायटेड एअर गॅस कंपनीचे अतुल नलावडे, अमोल नलावडे, सचिन आम्रे, संजय पडते, संदेश पारकर, अमित सामंत आदी उपस्थित होते.
'सध्याच्या प्लांटची क्षमता 20 केएल पर्यंत वाढवावी'
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोकणच्या किनाऱ्यावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी चक्रीवादळ अशा संकटांबरोबरच कोविडचाही मुकाबला करत आहात. केवळ मुकाबला न करता एक एक पाऊले पुढे टाकत आहात. तोही आगदी आत्मविश्वासाने. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. पुढच्या संकटाची गंभीरता कमी करण्यासाठी तजवीज करणे आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही त्यासाठी ही नियोजन करणे हे महत्वाचे आहे. सध्याच्या प्लांटची क्षमता 20 केएल पर्यंत वाढवावी. त्याचबरोबर मागील अनुभव पाहता जिल्ह्याला भासलेल्या ऑक्सिजनची आवश्यकता पाहून तशी तरतूद करून ठेवा.