सिंधुदुर्ग - भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारची स्तुती करण्यासाठी बॉलिवूडच्या अभिनेता, अभिनेत्रींना पैसे दिले जात आहेत. या कलाकारांनी सरकारबद्दल चांगल्या पोस्ट टाकाव्यात यासाठी या सेलिब्रेटिंना सेना भवनातून फोनही जातात, असा गंभीर आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.
ठाकरे सरकार प्रसिद्धीसाठी बॉलिवुडच्या सेलिब्रिटींना लाखो रुपये देते आमदार नितेश राणे यांची ट्विट करत टीका -
सध्या देशासह राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. लसीकरणाचा काळाबाजार, कोरोना मृतांचा वाढणारा आकडा यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पब्लिसीटीसाठी अनेक अभिनेत्यांचा वापर केला जात असल्याच्या आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.
सेलिब्रेटिंना सेना भवनातून जातात फोन -
आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राणे म्हणाले, राज्य सरकारची स्तुती करण्यासाठी बॉलिवूडच्या अभिनेता, अभिनेत्रींना पैसे दिले जात आहेत. कमी प्रसिध्द सेलिब्रेटींना दोन ते तीन लाख दिले जात आहेत. प्रसिद्ध सेलिब्रेटींना यापेक्षा जास्त पैसे दिले जात आहेत. सेलिब्रेटींना पैसे देऊन राज्य सरकारबद्दल चांगल्या पोस्ट टाकायला सांगितले जाते. या सेलिब्रेटिंना सेना भवनातून फोनही जातात, असे ही नितेश राणे म्हणाले.
सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन -
मागील काही दिवसांपासून विरोधी पक्ष राज्य सरकारवर आक्रमकपणे टीका करत असल्याचे दिसत आहे. आमदार राणे यांनी हा पब्लिसिटीसाठी खर्च होणारा पैसा कर देणाऱ्यांचा असून तो तिकडे खर्च केला जात असल्याचेही ट्विटमध्ये सांगितले आहे. आमदार नितेश राणे यांनी या ट्वीटमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन.