सिंधुदुर्ग - नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिंधुदुर्गातील भाजप कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला. यावेळी शेकडो स्वाभिमान कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, कणकवलीतून नितेश राणे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नितेश राणेंचा भाजप प्रवेश हेही वाचा - अखेर नितेश राणेंच्या हाती 'कमळ', काँग्रेसचा सोडला हात
गेले अनेक दिवस नारायण राणे यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करणार आहेत. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजप प्रवेश रखडलेला आहे. दरम्यान, राणेंचे पुत्र नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले आहे. नितेश राणे यांनी भाजप जिल्हा कार्यालयात दाखल होत भाजपचे सभासदत्व घेतले. यावेळी नितेश यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान, नितेश यांचा भाजप प्रवेश झाला असला तरी नारायण राणे मात्र प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत.
हेही वाचा - नितेश राणेंना भाजपच्या दुसऱ्या यादीत मिळणार स्थान?