सिंधुदुर्ग - भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही, असे म्हणत त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास असल्याचे राणे यांनी म्हटले.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे बळी गेल्यानंतर देखील 'हा' माणूस घरी बसून राहतो. आता ते बाहेर पडताहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय देणार आहेत, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे निष्क्रिय मुख्यमंत्री... राणेंचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबाबत अभ्यास शून्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (19ऑक्टो) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावर देखील नारायण राणेंनी टीका केली. मुख्यमंत्र्यांना त्यांचे कर्तव्य माहीत नसून लोकांचे बळी गेल्यानंतरही हा माणूस घरात बसून होता, असे ते म्हणाले. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, असे ते म्हणाले.
सरकार फक्त घोषणा करतं...
या सरकारचा पायगुण चांगला नाही. राज्याची तिजोरी रिकामी आहे. दुष्काळी परिस्थितीत मदत करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकार फक्त घोषणा करतं. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाचे पैसै अद्यापआले नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे राणेंनी सांगितले. आम्ही विरोधी पक्ष या नात्याने सरकारला या परिस्थितीत पैसे द्यायला भाग पाडू, असे ते म्हणाले.