सिंधुदुर्ग - ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे आरोप विरोधकांकडून अनेकदा झालेले आहेत. मात्र, मुलाच्या पराभवानंतर चक्क भाजप खासदार नारायण राणेंनीच निकालात हेराफेर झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पुत्राच्या पराभवानंतर खासदार नारायण राणेंकडून 'ईव्हीएम'मध्ये हेराफेरीचा संशय! - dipak bhagwat
मुलाच्या पराभवानंतर चक्क खासदार नारायण राणेंनीच निकालात हेराफेर झाल्याचा आरोप केला आहे.
आम्ही कुठेही कमी पडलो नाही. सर्व वातावरण आमच्या बाजूने होते. तरीही निकाल आमच्या विरोधात आला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निलेश राणेंचा झालेला पराभव आम्हाला मान्य नाही, असे म्हणत नारायण राणेंनी निकालात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर ओरस-पडवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे भाजप खासदार असलेल्या राणेंनीच ईव्हीएम निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून राणे यांचे पुत्र निलेश राणे हे पराभूत झाले आहेत. त्यामुळे राणेंना हा पराभव जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, संदीप कुडतरकर, डॉ मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निलेश राणेंचा झालेला पराभव आपल्याला मान्य नाही. एकंदरीत निकाल पाहिल्यावर संशयाला जागा निर्माण होते. हेराफेरी झाल्याचा संशय येतो. चिपळूण-रत्नागिरी मतदार संघात विजयी उमेदवाराचे कोणतेही काम केले नाही. या खासदाराला तेथील जनतेने कधी पाहिलेही नाही. मग मताधिक्य मिळते कसे? या उलट आमच्या सभांना उत्तम प्रतिसाद होता. उत्तम वातावरण होते. त्यामुळे नैतिकदृष्ट्या आमचा उमेदवार पडला नाही. पराभूत झालो असलो तरीही हा पराभव आम्हाला मान्य नसल्याचे नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आपल्याला निर्णय मान्य नाही यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का ? या प्रश्नावर उत्तर देताना, निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची की नाही याबाबत विचार करू. आतापर्यंत तक्रार केलेल्यांचे काय झाले? ते पाहू मग विचार करून निर्णय घेऊ, असे राणे यांनी सांगितले.