सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना १३ वर्षांपूर्वी विनाशकारी कळणे मायनिंग प्रकल्प जनतेच्या माथी मारला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून दिला आणि स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करून गावातील शिक्षक, डॉक्टर अशा प्रतिष्ठित नागरिकांना व शिवसैनिकांना कलम ३०२ अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून तुरुंगात टाकण्याचे काम केले, असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
नारायण राणेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी -
या प्रकल्पामधून हजारो लोकांना रोजगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले. गेल्या १३ वर्षांत कळणे मायनिंग प्रकल्पामुळे किती लोकांना रोजगार मिळाला? किती लोकांची भरभराट झाली? हे नारायण राणेंनी एकदा जाहीर करावे. याउलट खनिज वाहुन नेण्यासाठी अनेकांनी डंपर विकत घेतले. ते तरुण आता कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे आता नारायण राणेंनी केंद्रीय उद्योगमंत्री झाल्यानंतर कळणेवासियांच्या जीवावर बेतलेल्या या कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.