सिंधुदुर्ग - जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची आणि भाजप आमदार नितेश राणे यांची वैभववाडीतील नाधवडे गावात भेट झाली. आमदार नितेश राणे हे सध्या सरकारवर जोरदार टीका करताहेत तर चक्रीवादळाच्या निमित्ताने त्यांनी सरकारला अनेक आरोपांनी घेरले आहे. अशावेळी मंत्री बाळासाहेब पाटील आणि नितेश राणे यांनी नुकसानीची एकत्रित पाहणी केली. या पाहणीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
नुकसान झालेल्या भागाची नितेश राणे आणि मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली एकत्र पाहणी हेही वाचा -अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला हातोडा..पाहा व्हिडिओ
भाजप आमदार नितेश राणे यांनी केले मंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्वागत
वैभववाडी तालुक्यामध्ये चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपा आमदार नितेश राणे यांनी नाधवडे येथे नुकसानीची संयुक्त पाहणी केली. दरम्यान मतदारसंघात पहिल्यांदाच दौऱ्यावर आलेल्या मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आमदार नितेश राणे यांनी साहेब नमस्कार म्हणत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी व भाजपा कार्यकर्ते एकत्र आल्याने हा निव्वळ योगायोग की पुढील राजकारणाची नांदी. अशी जिल्ह्यात आज दिवसभर चर्चा होती. यावेळी आमदार नितेश राणे यांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे महसूल विभागाकडून केल्या जाणाऱ्या पंचनाम्यात त्रुटी असल्याची तक्रार केली आणि लक्ष घालण्याची मागणी केली.
नुकसानीची केली संयुक्त पाहणी
आमदार नितेश राणे हे ठाकरे सरकारवर सर्व बाजूने जोरदार प्रहार करत आहेत. मात्र आज आमदार नितेश राणे यांनी सरकारमधील प्रमुख मंत्र्याचे मतदारसंघात स्वागत करत त्यांच्याबरोबर नुकसानीची पाहणी केली. नाधवडे येथे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार नितेश राणे यांनी भेट देत संयुक्त पाहणी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र पाहणी केल्यास जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागतील अशा शब्दात आमदार नितेश राणे याना छेडले असता ते म्हणाले, आम्ही विरोधक कुठे आम्ही एकत्रच आहोत असे सांगत स्वतःचा हात दाखवत म्हणाले पहा माझ्या हातातही घड्याळ आहे.
सरकारकडून मदतीचे दिले आश्वासन
शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर, वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा पदाधिकारी जयेंद्र रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी येथील जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांच्या घरी चहा घेतली. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले लोकही एकत्र चहापानाचा आस्वाद घेताना दिसले.
हेही वाचा -कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल