सिंधुदुर्ग- नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सावंतवाडी शहरात मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता. 300 फूटाचा ध्वज घेऊन जगन्नाथ भोसले उद्यान येथून राष्ट्रगीताने मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मुख्य बाजारपेठ, गांधी चौक, भाट बिल्डिंगमार्गे नगरपरिषद येथे या मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारत माताकी जय, यासह एनआरसी कायदा झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर नगरपरिषद येथील नाथ पै सभागृहात या कायद्याची माहीती देण्यासाठी सभा घेण्यात आली.
त्यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले की, मुख्य नागरिकत्व कायदा हा 1995 मध्ये संसदेत करण्यात आला. त्यावेळी काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आत्तापर्यंत पाच वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. आता जी दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान बांगलादेश या तीन देशातील धार्मिक अल्पसंख्य नागरिकांना या देशात कायद्यानुसार जे धार्मिक छळामुळे देश सोडून दि. 31 डिसेंबर, 2014 पूर्वी आले आहेत. अशा व्यक्तींना भारताचे नागरिकत्व काही अटी शिथिल करून देण्यात येईल, नागरिकत्व दुरुस्ती कायदामुळे सध्याच्या कोणत्याही भारतीय नागरिकांवर परिणाम होणार नाही.