महाराष्ट्र

maharashtra

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाइन करावे; मालवण पंचायत समिती शासनाकडे शिफारस करणार

By

Published : Aug 2, 2020, 11:01 AM IST

मालवण तालुक्‍यात आम्हाला ७ दिवसांचे क्वारंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात १९ व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाइन करावं, अशी भूमिका सुनील घाडीगांवकर यांनी मांडली. शासनाला याबाबत शिफारस करण्यात येणार आहे.

Malwan Panchayat Samiti
मालवण पंचायत समिती

सिंधुदुर्ग - गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान १४ दिवस क्वारंटाइन करणे अत्यावश्‍यक आहे. यात बदल करुन शासनाने ७ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने क्वारंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली. याबद्दल पंचायत समिती शासनाकडे शिफारस करणार आहे.

शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर क्वारंटाइनची अट रद्द करुन चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्यावा. क्वारंटाइन करूच नये, अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शासन जे धोरण ठरवेल त्याचे पालन करावे लागेल असे सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्‍यात आम्हाला ७ दिवसांचे क्वारंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात १९ व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे ७ दिवस क्वारंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल.

चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करुन द्यावी, प्रशासनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विशेष मागणी पत्र पाठवावे, अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली.

शासनाने क्वारंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि घाडीगांवकर यांनी केली.

लग्नाला ५० लोकांना परवानगी मग गावात १०, २० नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भजन आरतीला बंदी का ? असा सवाल घाडीगावकर यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवात वाडीत भजन आरतीला परवानगी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या बनावट कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट देणारेही असतील हे नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करावी. अशीही मागणी घाडीगावकर यांनी केली.

मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. बालाजी पाटील हे एकमेव डॉक्‍टर आहेत तरी रुग्णालयात तात्काळ डॉक्‍टर उपलब्ध व्हावा, असा ठराव घाडीगावकर यांनी मांडला.

ABOUT THE AUTHOR

...view details