सिंधुदुर्ग- क्यार वादळाच्या तडाख्यानंतर आता 'महा' चक्रीवादळाची निर्मिती झाली असून याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 1 नोव्हेंबर रोजी गडगडाटासह पाऊस व विजा चमकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले असून जिल्ह्यातील नागरिक व मच्छिमारांनाही सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
'क्यार' नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे सावट
क्यार वादळाच्या तडाख्यानंतर आता 'महा' चक्रीवादळाची निर्मिती झाली असून याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे.
आताच येऊन गेलेल्या क्यार या वादळाचा मोठा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. या वादळामुळे झालेल्या अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. तर किनारपट्टी भागातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. क्यारच्या आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा 'महा' चक्रीवादळाचे सावट पसरले आहे. महाचक्रीवादळ हे लक्षद्विप क्षेत्र व नजीकच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सक्रीय झाले आहे. या चक्रीवादळाचा जोर 4 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे .हे चक्रीवादळ ताशी 22 कि.मी. वेगाने उत्तर पश्चिम दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी नौकांना परत बंदरात तात्काळ बोलावण्याचा सूचना प्रादेशिक मत्स्य उपायुक्त, मुंबई विभाग यांनी जिल्हा प्रशासन व मत्स्य विभागाला दिल्या आहेत.