महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात बेड कमी पडण्याची शक्यता - पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेव जर आठवडाभर जिल्ह्यात हीच स्थिती राहिली तर बेड कमी पडतील, अशी भीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर होम आयसोलेशनमध्ये दाखल असलेले रुग्ण योग्य प्रकारे काळजी घेत नसल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले जात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना सेंटर
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना सेंटर

By

Published : Apr 16, 2021, 12:32 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यासाठी 16 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गेले चार दिवस ठप्प असलेले कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयामध्ये बेड वाढविण्यात आले आहेत, तर होम आसोलेशन कमी करण्यात आले आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. तर अजून आठवडाभर हीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात बेडची कमतरता भासण्याची शक्यता असल्याची भीती डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

66 हजार 240 लसीचे डोस झाले उपलब्ध
16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात महसूल व पोलीस अधिकारी कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधिग्रस्त लोकांना लस दिली गेली. त्यानंतर 1 एप्रिलपासून चौथ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाला गर्दी होत आहे, तर दुसरीकडे लसींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे 9 एप्रिलला कोरोना लसींचा साठा संपून लसीकरण ठप्प झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 66 हजार 240 लसीचे डोस उपलब्ध झाले होते. ते सर्व संपलेले आहेत.

जिल्ह्यासाठी नव्याने 16 हजार लस उपलब्ध
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी लस मिळण्यासाठी आरोग्य संचालकांकडे पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 16 हजार लसीचा साठा मिळाला आहे. पुणे येथून लस घेऊन व्हॅन रवानाही झाली होती. त्यामुळे आता पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. खलिपे यांनी दिली. कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवडय़ानंतर आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चार ते सहा आठवडय़ानंतर घ्यायचा आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

शासकीय आस्थापना मध्ये बेड वाढवायला सुरवात
होमआयसोलेशनमध्ये दाखल असलेले रुग्ण योग्य प्रकारे काळजी घेत नाहीत. त्यांच्यामुळे कुटुंबाला आणि इतरांनाही संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे होमआयसोलेशनमधील रुग्ण कमी करण्यात येत आहेत व सरकारी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत पुरेसे बेड उपलब्ध आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने अजूनही बेड वाढवावे लागणार आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयासह सर्व तालुक्यात कोविड सेंटर सुरू केले आहेत. गरजेनुसार होमगार्डची नवी इमारत तसेच कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाची इमारत ताब्यात घेतली जाणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आठ दिवसांत बेडचा तुटवडा भासू शकतो
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जिल्हा रुग्णालयातील सर्व इमारती व सर्व वार्ड आता हळूहळू कोविड सेंटरमध्ये कन्व्हर्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आदींमध्येही कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात ज्या खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे, अशा रुग्णालयांमध्येही पुन्हा कोविड सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात सर्व रुग्णालयांमधे बेड उपलब्ध आहेत. मात्र अजून आठवडाभर हीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात बेडची कमतरता भासण्याची शक्यता असल्याची भीती डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -हाफकिनला कोवॅक्सीनचे उत्पादन घेण्याकरता केंद्राची मान्यता; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details