सिंधुदुर्ग-कुडाळमध्ये पोलिसांकडून ६० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी ही कारवाई केली. सईद कादर शेख असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुडाळ एमआयडीसी परिसरात सापळा रचला होता. नियोजित स्थळी संशयित आल्यानंतर त्याला पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहात पकडले.
दरम्यान, आरोपी सईद कादर शेख याच्याकडून पोलिसांनी ३ किलो ५० ग्रॅम गांजा हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, हवालदार कोंडे, पोलीस शिपाई खंडये, इंगळे, तोरसेकर, खाडये आदींनी केली.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. त्यामुळे या टोळीची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.