सिंधुदुर्ग- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 230 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 62.32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वैभववाडी प्रमाणेच सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्गमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. तिलारी धरणाच्या विसर्गामध्ये वाढ झाली आहे.
सतत मुसळधार पावसामुळे सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून सध्या 162.91 घ.मी. प्रती सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तिलारी धरण 82.72 टक्के भरले असून सध्या या प्रकल्पामध्ये 370.0780 द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांत 91.40 मि.मी. पाऊस झाला असून यंदाच्या मोसमात एकूण 2 हजार 525.80 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरूणा प्रकल्पामध्ये देखील 67.23 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. तर देवघर मध्यम प्रकल्प 63.22 टक्के भरला आहे. जिल्ह्यातील 16 लघू पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर तरंदळे व सनमटेंब लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आडेली, निळेली, हरकुळ, ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.