पणजी - गोव्यात भाजपने प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यानी राज्यातील विविध मतदारसंघाचे दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार का? असा प्रश्न एका बाजूने उपस्थित केला जात आहे. मात्र, गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यास साफ नकार देत निवडणुका फेब्रुवारी 2022 नंतरच होणार असल्याचे सांगितले आहे.
'राज्यात खाण महामंडळ सुरू करणार
'राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी सरकारने खाण महामंडळ सुरू करण्याचे ठरवले आहे. तशी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्यपाल पी. एस. श्रीधरनपिल्लई यांनी मान्यता देताच पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे', असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
निवडणुका उशिरा झाल्यास भाजपला फायद्याचेच?
सध्या राज्यात भाजप सरकार राबवत असलेले अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. यात मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, झुआरी नदीवरील नवा सागरी सेतू, तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही जोरात सुरू आहे. निवडणुकीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग तसेच झुआरी सागरी सेतू प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारने दोन्ही कंत्राटदारांना डिसेंबर 2021 ची मुदत दिली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे सध्या भर पावसातदेखील काम सुरू आहे. हे दोन्ही प्रकल्प येत्या निवडणुकीत भाजपची जमेची बाजू ठरणार आहे.