सिंधुदुर्ग: भाजप-शिवसेनेची राज्यात सर्वत्र युती असताना कोकणात भाजप-सेनाच आमने-सामने उभे ठाकले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आणि त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची औपचारिकता पूर्ण करून घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवाराला येथे ७० टक्के मते मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच येथे दुसऱ्या दिवशी झालेल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका करत भाजपलाही अपप्रवृत्तीला दूर ठेवण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा -सत्ता पुन्हा महायुतीचीच येणार, भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार - किरीट सोमय्या
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये नारायण राणेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. ट्विट करून त्यांनी 'चार हाडांचा BMC चोर कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू', असे म्हटले आहे. या 'बाकीचं लवकर बोलू', यामध्ये नेमकं काय दडलंय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात जर भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला. तर शिवसेनेला न गोंजारता इतर छोट्या-मोठ्या पक्षांच्या पाठिंब्यावर भाजप सत्ता स्थापन करू शकतो. असे झाल्यास कोकणात असलेले शिवसेनेचे वर्चस्व राणेंच्या मदतीने भाजप कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी चर्चा आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात आपल्याकडे बरेच काही आहे, आपण तोंड उघडल्यास अनेक गोष्टी समोर येतील, असे राणेंनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेला थंड करण्यासाठी भाजप राणेंना हाताशी धरू शकतात, असेही बोलले जात आहे.
हेही वाचा -'त्यांच्या'मुळे भाजपची वाताहात होईल; उद्धव ठाकरेंचे मोठे भाकीत
पाठीत वार करणारी औलाद सोबत कशाला. नारायण राणे हे केवळ सत्तेसाठी हपापले आहेत. इकडे वाकोबा, तिकडे वाकोबा आणि म्हणे आम्ही स्वाभिमान, हा कसला स्वाभिमान? करून करून भागले आणि राणे देवपूजेला लागले आहेत, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर केली होती.