महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार नाईक यांचे काम शून्य; मात्र फोटोसेशनची शंभरी, मनसे नेते उपरकर यांचा आरोप - sindhudurg breaking news

राज्य पातळीवरील प्रश्न सोडविम्याण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अपुरे पडत आहेत. आमदार वैभव नाईक केवळ मंत्रालयात जाऊन वेगवेगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेत फोटोसेशन करत असून या फोटोसेशनने शंभरी गाठल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

उपरकर
उपरकर

By

Published : Oct 11, 2020, 3:22 PM IST

सिंधुदुर्ग - राज्य पातळीवरील प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अपुरे पडत आहेत. आमदार वैभव नाईक केवळ मंत्रालयात जाऊन वेगवेगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेत फोटोसेशन करत असून या फोटोसेशनने शंभरी गाठल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. आमदार नाईक यांनी केलेली बोगस कामे आणि भ्रष्टाचार आगामी काळात मनसे जनतेसमोर मांडणार असल्याचेही उपरकर यांनी मालवणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तर 13 ऑक्टोबरला मनसे जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, मनसेच्या वतीने पक्ष बांधणीसाठी जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. मागील पंधरा दिवसात मालवण तालुक्यात सर्जेकोट, तारकर्ली, देवबाग, मालवण शहर, साळेल याठिकाणी युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मनसेमध्ये प्रवेश केला. कोरोना कालावधीत ज्याठिकाणी मुख्यमंत्री सर्वसामान्यांना उपलब्ध होत नव्हते, त्या ठिकाणी राज ठाकरेंनी जनतेचे प्रश्न जाणून घेत विरोधी पक्षाची भूमिका निभावली. त्यामुळे आता मातोश्रीपेक्षा कृष्णकुंजवर गेल्यानंतर न्याय मिळतो हे अधोरेखित झाले आहे. यामुळेच येणारा काळ मनसेसाठी उज्ज्वल आहे. सिंधुदुर्गातही मनसेने कोरोना काळात रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न हाताळले. मात्र, जिल्ह्यातील सत्ताधारी राज्य पातळीवरील प्रश्न सोडविण्यात अपुरे पडत आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयात गेले अनेक महिने एकच डॉक्टर 24 तास आरोग्य सेवा देत आहे. मात्र याबद्दल आमदार नाईक यांना सहानुभूती नाही. रुग्णवाहिकेच्या अभावी जनतेचे जीव जात आहेत. मालवण शहरात एका वृद्ध महिलेला रुग्णवाहिकेच्या अभावी प्राण गमवावा लागला. अशावेळी आमदारांनी काही दिवसांपूर्वी गाजावाजा करून उद्घाटन केलेली रुग्णवाहिका त्या महिलेला भेटली असती तर तिचा जीव वाचला असता. आमदार वैभव नाईक यांनी अलीकडेच ग्रामीण रुग्णालयाला शवपेटी दिली आहे. याच कारणासाठी ही शवपेटी दिली होती का ?, असा सवाल उपरकर यांनी केला.

वैभव नाईक यांच्यावर टीका करताना पारंपारिक मच्छिमार प्रश्न, देवबागचा बंधारा, देवबाग नळपाणी योजना हे सर्व प्रश्न सोडविण्यात आमदारांना अपयश आल्याचे सांगून कुडाळ महिला रुग्णालय सहा महिने अपूर्ण आहे. या रुग्णालयाला एक कोटी रुपयांचा निधी आणण्याची घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या रुग्णालयासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे वृत्तपत्रातून त्यांनी सांगितले. एकाच कामाच्या वेगवेगळ्या घोषणा ते करत असून अद्यापपर्यंत या रुग्णालयाला कोणताही निधी प्राप्त झालेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहेत. या विरोधात येत्या 13 ऑक्टोबरला मनसेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पोलीस ठाण्याला निवेदन देऊन हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. यानंतर एक महिन्यांच्या कालावधीत हे अवैध धंदे बंद न झाल्यास उपविभागीय पोलीस कार्यालयावर मनसेच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. याचवेळी तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांना शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून भरपाई देण्यासाठी निवेदने देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गात काही मायक्रो फायनान्स कंपन्या महिला बचत गटांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपन्यांना मनसे रोखणार असून महिला बचत गटांचे कर्ज माफ करून त्यांना अल्प व्याजदराने आगामी कालावधीसाठी नव्याने कर्जाची मागणी केली जाणार असल्याचे उपरकर म्हणाले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यास प्रत्येक तालुक्यात घंटानाद आंदोलन करून ग्रामीण जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहर आणि प्रमुख बाजारपेठेमध्ये 17 ऑक्टोबर पर्यंत मनसेचा भगवा ध्वज लावला जाणार असल्याचेही यावेळी माजी आमदार उपरकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -गोवा पत्रादेवी चेकपोस्टवर ७ लाख ३१ हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details