सिंधुदुर्ग - विनयभंगाच्या गुन्ह्याखाली फरार असलेले सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी अखेर आज (गुरुवार) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात शरणागती पत्कारत हजर झाले. फेब्रुवारी महिन्यापासून ते पोलीसांना हुलकावणी देत होते. अखेर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले
डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी विनयभंग केल्याची फिर्याद सिव्हिल हॉस्पिटलमधील पीडित महिला कर्मचाऱ्याने दिली होती. त्यानुसार डॉ.श्रीमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी डॉ.चव्हाण यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानेही 23 मार्च रोजी डॉ.चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणे अथवा पोलिसांना शरण जाणे, हे दोन पर्याय डॉ.चव्हाण यांच्यासमोर होते. 23 मार्चपासून डॉ.चव्हाण पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर आज (गुरुवार) डॉ.श्रीमंत चव्हाण सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. डॉ.चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.