सिंधुदुर्ग - जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या लिंकवर आजपर्यंत एकूण 16 हजार 934 नागरिकांनी नोंद केली आहे. त्यापैकी जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 8 हजार 174 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने 110 पासेस दिले आहेत. तर 71 व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
उत्तरप्रदेशमधील 24, तेलंगाणामधील 11, राजस्थानमधील 12 जणांना 5 मे रोजी रवाना करण्यात आले. तर गुरुवारी रायगड जिल्ह्यातील 13 व मालवण व वैभववाडी तालुक्यातून राजस्थानमधील एकूण 11 जणांना रवाना करण्यात आले आहे. गोवा राज्यात अडकलेल्या जिल्ह्यावासियांना जिल्ह्यात परतण्यासाठी पास देण्यात आले असून सदर लोक जिल्ह्यात दाखल होत आहेत. आतापर्यंत गोवा राज्यातून सुमारे 317 व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. हे व्यक्ती एस.टी. बस तसेच खासगी वाहनाने आले आहेत. तर गोव्यातील 98 व्यक्ती एस. टी बसने व 30 व्यक्ती खासगी वाहनाने जिल्ह्यात येणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातूनही नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत.