सिंधुदुर्ग -तौत्के चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झाले आहे. या वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. यामुळे खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. या वादळाचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. महामार्गावर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक खासगी बस पलटी झाली. या अपघातात एका पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर जिल्ह्यात ४० घरे आणि ३ शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
सावंतवाडी-वेंगुर्ले तालुक्याला वादळाचा फटका -
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटातील काही दरडीचा भाग व झाडे कोसळून रस्त्यावर आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर सावंतवाडी पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ.नाथ पै सभागृहाच्या सिलिंगचा भाग कोसळला आहे. त्या सभागृहाचे काम चालू असल्याने त्यावरील पत्रे काढण्यात आले होते. मात्र अचानक पाऊस झाल्यामुळे हा प्रकार घडला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वेंगुर्ला तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे, विद्युत खांब पडून मार्ग ठप्प झाले. तर वादळी वाऱ्याने कौले तसेच पत्रे उडून गेल्याने काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणीही जाण्याचे प्रकार घडले. दरम्यान, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान कणकवली - वैभवाडीत खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान - वादळामुळे कणकवली तालुक्यातील भैरवगाव येथील रमेश कदम यांच्या घराच्या छप्पराची कौले, पत्रे व कोने वादळी वाऱ्याने उडून जात नुकसान झाले. तर वाघेरी उपकेंद्रावर फणसाच्या झाडाची फांदी पडून या उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. भिरवंडे रामेश्वरनगर येथील राजेंद्र सावंत यांच्या घराची कौले, कोने व पत्रे वादळी वाऱ्याने उडून जात नुकसान झाले. तर कुंभवडे येथील उमेश सुतार यांच्या सुतार शाळेच्या इमारतीच्या छपराचे कोने, पत्रे व कौले वादळी वाऱ्याने उडून जात नुकसान झाले. हुबरट येथे रस्त्यावर झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र तातडीने जेसीबी द्वारे हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर जे पवार यांनी दिली. या वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शाळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात पडला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात -
ओरोस येथे पावलो ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन झालेल्या अपघातात पायी चालत जाणारे दूध व्यवसायिक मंगेश महादेव सावंत (वय ४६) रा.सावंतवाडा हे जागीच ठार झाले. तर गाडीतून प्रवास करणारे दोघे गंभीर जखमी झाले तर अन्य काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भवानी मंदिर ओरोस येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. शोभा रवि वाघेला रा.म्हापसा व सोपान आशिष दुबे रा.अंधेरी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.याबाबतची माहिती पोलीस ठाण्याचे हवालदार गुरुदास पाडवे यांनी दिली गोवा येथून ही बस मुंबईच्या दिशेने जात होती. ओरोस येथे आली असता रस्त्यावर पावसाचे पाणी असल्यामुळे चालकाचा ताबा सुटला,व बस पलटी होऊन पुन्हा गोव्याच्या दिशेने उलटी कोसळली. यावेळी त्या ठिकाणी दूध पोहोचवण्यासाठी चालत जात असलेले मंगेश सावंत हे त्या बस खाली चिरडले गेले. अपघाताचा आवाज येताच त्या ठिकाणी स्थानिकांनी धाव घेतली, जखमींना अधिक उपचारासाठी ओरोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालवण तालुक्यात वीज पुरवठा खंडित -
मालवण तालुक्यात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवबाग सामंतवाडी येथील निळकंठ सामंत यांचा माड रस्त्यावर कोसळल्याने दोन वीज खांबही मोडून पडले. तर देवबाग ख्रिश्चनवाडी येथे आंतोन रॉडिक्स व अनिल मोंडकर यांच्या रिसॉर्टच्या शेडवर झाड कोसळून नुकसान झाले आहे. देवबाग येथील मोनिका फर्नाडिस यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले तर मालवण चौके मुख्य रस्त्यावर देखील झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. हे झाड प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजूला करण्यात आले आहे. मालवण शहरात देखील काही ठिकाणी पडझड झाली असून शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांचे नुकसान -
तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत एकूण ४० घरांचे नुकसान झाले आहे. तसेच २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. ३१ ठिकाणी झाडे पडली असून ३ शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. दोडामार्ग तालुक्यात ८ झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात ६ ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे. तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात २ घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर ४ ठिकाणी झाडे पडली आहेत. तसेच एका ठिकाणी विद्युत पोलही पडला आहे. मालवण तालुक्यात २ ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका पत्र्याच्या शेडचे नुकसान व एक विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ९ घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले असून २ ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे.