सिंधुदुर्ग- निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती सामान्य आहे. पण किनारी भागात जोरदार वारे वाहत असल्याने समुद्र खवळलेला आहे. तर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मालवण तारकर्ली येथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच स्थानिक पातळीवर काम करणारे आपत्कालीन ग्रुपनाही तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीहून मुंबईकडे कूच करत आहे. हे वादळ आज अलिबागला धडकून दुपारी मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.