महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तक्रारीसाठी एक अन् सेटलमेंटसाठी दुसरी सही, परशुराम उपरकरांचा शिवसेना आमदार वैभव नाईकांवर आरोप - परशुराम उपरकर आरोप

अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या ई-निविदा क्रमांक 3मध्ये मोठा घोटाळा झाला असून राजकीय पक्षाचे नेते आणि अधिकारी यांच्या संगनमताने कामे वाटून घेतली गेली असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

आरोप करताना माजी आमदार
आरोप करताना माजी आमदार

By

Published : Sep 26, 2020, 5:40 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या ई-निविदा क्रमांक 3मध्ये मोठा घोटाळा झाला असून राजकीय पक्षाचे नेते आणि अधिकारी यांच्या संगनमताने कामे वाटून घेतली गेली आहेत. याबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रलंबित निविदांची 15 दिवसांत प्रक्रिया करून कार्यारंभ आदेश देणारे दुसरे पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. या दोन्ही पत्रांवरील आमदारांची सही वेगवेगळी आहे. त्यामुळे आमदारांची भूमिका संशयास्पद असून आमदार वैभव नाईक तक्रारीसाठी एक आणि सेटलमेंटसाठी दुसरी सही करतात, असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

आरोप करताना माजी आमदार

या प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला आहे. तरी याबाबत चौकशी करून ही निविदा प्रक्रिया नव्याने घ्यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. या घोटाळ्याबाबत चोकशी होऊन निविदा प्रक्रिया नव्याने राबविली गेली नाही तर, या निविदेतंर्गत केंद्र सरकारच्या निधीचा अपव्यय होणार असल्याने मनसे सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले. ते कणकवली येथे बोलत होते.

परशुराम उपरकर म्हणाले, अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या ई-निविदा क्रमांक 3 हे 26 जून रोजी काढल्या होत्या. निविदांमध्ये ठराविक ठेकेदारांना काम देण्यात आले होते. या निविदांमध्ये भ्रष्टाचार व घोटाळा झाल्याचे 15 सप्टेंबर रोजी कुडाळ-मालवण विधानसभा आमदार वैभव नाईक यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना शिफारस करून कारवाई करण्याचा शेरा मारला होता, असे उपरकर यांनी सांगितले. या निविदा प्रक्रियेमध्ये घोळ झालेला आहे. तसेच या निविदांमध्ये अनियमितता आणि ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने निविदा भरलेल्या आहेत. यातील काही निविदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांनी व काही कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांनी भरल्याचे समजते, असेही ते म्हणाले.

निविदेच्या तारखेपासून 2 ऑक्टोबरला 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आमच्या माहितीनुसार निविदेचा कालावधी संपलेला असल्याने फेरनिविदा करण्यात यावी. अन्यथा या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसे आवाज उठवून शासनाची होणारी लूट थांबविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील, असा इशाराही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

हेही वाचा -जनता कर्फ्यूमुळे कणकवलीत राजकीय तणाव

ABOUT THE AUTHOR

...view details