सिंधुदुर्ग - सुरंगी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगली फुलशेती कोरोनाच्या संकटात चांगलीच प्रभावित झाली आहे. जिल्ह्यातील ४२ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या शेतीतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ८०० कुटुंबाना रोजगार मिळतो. या फुलांच्या केवळ १५ दिवसाच्या हंगामात १६ कोटींची उलाढाल होते. अवघे १५ दिवस काम करून त्यावर वर्ष घालवणारी अनेक कुटुंबे जिल्ह्यात आहेत. त्यांचा हा सहजासहजी होणारा व्यवसाय यावर्षी कोरोना विषाणूच्या फैलावामुळे थांबला आहे. जिल्ह्यातल्या ८ ते १० गावांची अर्थव्यवस्था त्यामुळे पुरती कोलमडून गेली आहे.
कोरोना इफेक्ट : कोट्यवधींची सुरंगीची उलाढाल अडचणीत, शेतकऱ्यांकडे कळा आहे पडून - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती
जिल्ह्यातील ४२ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या सुरंगीच्या शेतीतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ८०० कुटुंबाना रोजगार मिळतो. या फुलांच्या केवळ १५ दिवसाच्या हंगामात १६ कोटींची उलाढाल होते. अवघे १५ दिवस काम करून त्यावर वर्ष घालवणारी अनेक कुटुंबे जिल्ह्यात आहेत. त्यांचा हा सहजासहजी होणारा व्यवसाय यावर्षी कोरोना विषाणूच्या फैलावामुळे थांबला आहे.
सुरंगीची झाडे जिल्ह्यातील प्रामुख्याने वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात आहेत. आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल, कोलगाव, आकेरी या गावांमध्ये सुरंगी विशेषकरून बहरते. काही भाग यासाठी पोषक मानला जातो. कोलगाव, आकेरी येथे सुरंगीचे गजरे करून अनेक महिला रस्त्यावर उभ्या राहून विकतात आणि आपला रोजगार मिळवतात. सुरंगीचे कळे वेचता यावेत म्हणून झाडाखाली कापड अंथरून ठेवावे लागते. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे वेचलेला कळा पडून आहे.
सुरंगीच्या फुलांना आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये, रंग आदीसाठी मोठी मागणी आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बऱ्याच कष्टाने याची कलमे बनविली आहे. सुरंगीचा कळा सुकवून बाजारात विकला जातो. एका झाडाला साधारणतः ३०-३५ किलो कळा मिळतो. याचा दर ३०० पासून ६०० रुपये किलो पर्यंत असतो. त्यातून एका कुटुंबाला ५० हजार रुपयापासून ६ लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे सुरंगीच्या झाडावरून कळा काढण्याचे काम मोठ्या जोखीमेचे असते. मजूर यासाठी ८०० रुपयापर्यंत रोजाने मजुरी घेतात. ही फुले झाडाच्या खोडला आणि छोट्या फांद्यांना येतात. त्यामुळे ती काढताना अनेकजणांनी आपला जीव गमावला आहे. तर, काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
मार्च हा सुरंगीचा हंगाम, यावर्षी चांगली फुले आली आहेत. त्यात सुरंगीवर अवलंबून असलेले लोक सुखावले असताना कोरोनाचे संकट आले. त्यात आणखीन अवेळी पाऊस झाल्याने जो काही सुरंगीचा कळा हातात आला होता तोही काळवंडून गेला आहे.