सिंधुदुर्ग- जिल्हा बँका व सहकारी संस्थांच्या निवडणुकांवेळी मतदारांच्या गाठीभेटी होतील. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने या निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास त्या मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येतील, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढविणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री पाटील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर उपस्थित होते.
प्रादुर्भाव कमी झाला, तर मार्चपूर्वीच निवडणुका
मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा बँका व सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढला. त्यामुळे डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रादुर्भाव कमी न झाल्यास त्या मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येतील. पण प्रादुर्भाव कमी झाला, तर मार्चपूर्वीच त्या घेण्यात येतील. जेणेकरून भविष्यात उन्हाळा व अन्य त्रास होऊ नये, याचा विचार करण्यात येईल. सहकारी संस्थांचा लाभांश व महत्वाचे निर्णय सर्वसाधारण सभेत घेणे शक्य नसल्याने या वर्षापुरता कायद्यात बदल करून संचालक मंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
ठरलेल्या धोरणानुसार निधी
आमचे सरकार आले, तेव्हापासून कोरोना आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या निधीला कट लागला. तसेच अन्य विकास निधीही कमी झाला. त्याचा विकासावर व विकासकामांवर परिणाम झाला, असे सांगून ते म्हणाले, तीन पक्षांचे सरकार असून ठरलेल्या धोरणानुसार निधी दिला जातो. सिंधुदुर्गात 60 : 20 : 20 असे प्रमाण ठरलेले आहे. त्याप्रमाणे निधी मिळेल. मात्र, तसे न झाल्यास त्याची दखल घेण्यात येईल. राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातूनही विकासनिधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व विविध योजनांतून शेतकऱयांना दिलासा देण्याचे काम हे सरकार करीत आहे व भविष्यातही करणार आहे. हापूस आंब्याला भविष्यात थेट ग्राहकांकरवी खरेदीची मुभा पणन मंडळाकडून दिली जाईल. साहजिकच शेतकऱ्याला चांगला दर मिळेल, असे पाटील म्हणाले. कोरोनामुळे यंदा परदेशात हापूस गेला नाही. त्याचा तोटा शेतकऱ्यांना झाला, असे ते म्हणाले.
खावटी कर्जाचा प्रश्नही विचारात घेण्यात येणार
कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील सोसायटीच्या सभासदांना कर्जमाफी मिळाली नाही, याबाबत चर्चा झाली. या प्रकरणाचा अभ्यास करण्यात येईल, असे सांगून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. खावटी कर्जाचा प्रश्नही विचारात घेण्यात येणार आहे. मात्र, काही संस्थांना घटना दुरुस्ती करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सहकारात राष्ट्रवादी काँग्रेसचे वजन आहे. मोठ्या प्रमाणावर संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस एकत्रित लढविणारच. मात्र, सहकारातील मोठा सहभाग राष्ट्रवादीचा असल्याने साहजिकच राष्ट्रवादी आपल्या वाटय़ाच्या जागा मिळविण्याचा प्रयत्न करणार, असे सांगतानाच आमचे नेते शरद पवार व त्या-त्या पक्षांचे नेते एकत्रित अंतिम निर्णय घेतील, असे पाटील यांनी सांगितले.