सिंधुदुर्ग -कोकणात होळी सणानिमित्त चाकरमानी येत आहेत. मात्र चाकरमान्यांच्या येण्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथे जिल्हा बाहेरून येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांची अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या अन्य सीमांवर देखील अशाच पद्धतीची आरोग्य पथके आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा -औरंगाबादेत बंदी असूनही खासदार इम्तियाज जलील काढणार मोर्चा
सीमांवर आहे अपुरा पोलिस बंदोबस्त
चाकरमानी आणि अन्य जिल्ह्यातील लोक होळी उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असताना, जिल्ह्याच्या सीमांवर मात्र अपुरा पोलिस बंदोबस्त पाहण्यास मिळत आहे. खारेपाटण चेक पोस्टवर तपासणी करण्यासाठी चाकरमान्यांना थांबविले जाते. परंतु, याठिकाणी मोठी वर्दळ असतानाही केवळ एकच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा -राज्यात आज आठ वाजल्यापासून जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू, सरकारकडून नवीन गाईडलाईन
पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास जिल्हा रुग्णालयात रवानगी
जिल्हा आरोग्य विभागाचे पथक खारेपाटण पोलीस चेक पोस्टवर तैनात करण्यात आले आहे. डॉक्टर धनश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहे. यावेळी बोलताना डॉक्टर धनश्री जाधव म्हणाल्या ''मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची आम्ही तपासणी करतो. त्यांच्यामध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांना खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करतो. या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. ही चाचणी पॉझिटिव आल्यास या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून 31 मार्चपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.