सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील चिपी विमानतळ सध्या प्रवासी विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहे. खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर गणपतीपूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, चिपीवरुन विमानसेवेऐवजी राजकारण दणक्यात सुरू झालेले आहे.
सिंधुदुर्ग: चिपी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे धूसर, पालकमंत्र्यांवर विरोधकांची टीका - चिपी विमानतळ
चिपी विमानतळावर गणेश चतुर्थीला पालकमंत्री जर अनधिकृतरीत्या विमान उतरवीत असतील तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला चिपी विमानतळावर विमान उतरवण्याची यशस्वी चाचणी पार पडली. त्यानंतर काहीच महिन्यांनी मुख्यमंत्री, हवाई वाहतूक मंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचे उद्घाटन झाले. यानंतर तरी लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होईल, अशी कोकणवासीयांना अपेक्षा होती. मात्र, यंदाचा गणेशोत्सव जवळ आला तरी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे धूसर दिसत आहेत. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची आयतीच संधी साधलेली आहे.
चिपी विमानतळावर गणेश चतुर्थीला पालकमंत्री जर अनधिकृतरीत्या विमान उतरवीत असतील तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. तर मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दीपक केसरकर यांच्यावर शरसंधान साधले आहे. उद्घाटन करुन पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी एकत्रित येत आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तसेच जनतेच्या फसवणुकीची जाणीव करुन देण्यासाठी खेळण्यातले विमान पालकमंत्र्यांना पाठवत असल्याचे उपरकर यांनी सांगितले. त्यामुळे यंदा तरी चाकरमान्यांचे विमानाने आगमन होणार का? याचीच उत्सुकता कोकणवासीयांना लागलेली आहे.