सिंधुदुर्ग- तौक्ते चक्रीवादळानंतर तब्बल 22 दिवसांनी केंद्रीय पथकाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली. लवकरच आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती या पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. वेंगुर्ला येथे दाभोली, नवाबाग, केळूस या भागात या पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्राकडून ठोस नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी स्थानिक नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. अनेक बागायतदारांनी अद्यापही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नसल्याची कैफियत या पथकासमोर मांडली आहे.
चक्रीवादळग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, स्थानिकांनी मांडली आपली कैफियत माड सुपरी बागायतीच्या नुकसानीचा घेतला आढावा
आज केंद्रीय समितीने वेंगुर्ले तालुक्यात पाहणी करताना येथील माड सुपरी बागायतीच्या नुकसानीचा आढावा घेतला. या पथकात अर्थविभागाचे प्रमुख अभय कुमार, केंद्रीय कृषी खात्याचे सिंग, ऊर्जा विभागाचे प्रमुख जे.के. राठोड, केंद्रीय मत्स्य विभागाचे प्रमुख अशोक कदम यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तत्कालीन प्रांताधिकारी तुषार मठकर, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण फोवकांडे आदी उपस्थित होते.
'नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल केंद्राकडे सादर करणार'
दरम्यान, जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल आपण केंद्राकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली. तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील बागायत क्षेत्राचे आणि मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन पाहणीसाठी फिरणाऱ्या या समितीच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
वीज कंपनीला केंद्रीय समितीने दिलल्या सूचना
केवळ वादळामुळे नुकसानी झाल्यावरच वीज पोल न बदलता खबरदारी म्हणून खराब झालेले पोलही इतर कालावधीत बदलून घेण्याची सूचना समिती सदस्यांनी केली. मालवण, वेंगुर्ले ही गावे समुद्र किनारी वसलेले असल्याने वीज पोलांना गंज लागून ते खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत ही बाब निदर्शनास आणून दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे मोठी हानी झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय यंत्रणेने योग्य ते पंचनामे केले आहेत का ? याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय समितीचा दौरा असून याचा योग्य तो अहवाल केंद्राकडे सादर करण्याचे समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी सांगितले.
हेही वाचा- शिर्डी साईमंदिर सुरू करा, अन्यथा आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा