सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सध्या काजू पीक अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम काजू बागायतदारांना सोसावा लागत आहे. मागील वर्षी 180 रुपयाने किलो असलेला भाव यावर्षी 60 ते 80 रुपये किलोवर आला आहे. विशेष म्हणजे व्यापारीही काजू खरेदी करायला नकार देत असल्याचे बागायतदार सांगत आहेत. बाजार बंद असल्याने स्थानिक पातळीवरचे प्रक्रिया उद्योगही बंद झाले आहेत.
काजूला असणारी मागणी आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत आहे. काजू खाणारा वर्गदेखील हायप्रोफाईल समजला जातो. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांनाच तो परवडतो. त्यामुळे काजूचे दर दरवर्षी वाढत असतात. सण 1999 ते 2003च्या दरम्यान 80 रुपये प्रतिकिलो असलेली काजूचा दर वाढत गेला, गतवर्षी 180 रु. किलोवर पोचला होता. सध्या कोरोनामुळे काजू संकटात सापडला असून दराच्या बाबतीत तो सात वर्ष मागे गेला आहे.
कोरोनामुळे कोकणातील काजू बागायतदार संकटात सापडला असून त्याला हमीभाव मिळावा अशी मागणी केली जात आहे. कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील काजू बागायतदार नंदकिशोर वसंत तिरोडकर यांनी यावर्षी 80 रुपये किलो दराने काजू विकले आहेत. शिवाय वर्षभराचा सर्व व्यवहार काजू उत्पादनावर अवलंबून आहे. त्यात वातावरणाच्या प्रभावामुळे आधीच काजू उत्पादनात घट झाली असून आता दर नसल्याने कर्जबाजारीपणाचे संकट बागायतदारांसमोर उभे असल्याचे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय चलन मिळवून देणारे उत्पादन -
समुद्र किनारपट्टीलगतच्या भागामध्ये काजू उत्तम दर्जाचा होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागात काजूचे पीक हे प्रमुख पीक आहे. परकीय चलन देणाऱया काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. विशेषतः कोकणातील काजूची चव उत्तम असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जगाचा विचार केला असता काजू उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी मानला जातो. भारताच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा मोठा आहे.