सिंधुदुर्ग - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची चारचाकी अज्ञाताने जाळली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून, तपास सुरू आहे.
संजू परब यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी खासकीलवाडा परिसर रोड येथील साई दीपदर्शन इमारतीच्या समोर उभी केली होती. बारा वाजण्याच्या सुमारास ते घरी गेल्यानंतर गाडी जळत असल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता गाडीला आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी तत्काळ गाडीच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी दारूचे साहित्य तसेच कॅनचे बुच आढळून आले आहेत. त्यामुळे गाडीवर कोणता तरी ज्वलनशील पदार्थ ओतून हा प्रकार केला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.