सिंधुदुर्ग - जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाने 8 कोटी 73 लाख रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करून ती रक्कम शासनाकडे मागणी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटीची मदत कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना जाहीर केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली रक्कम मिळालीच नाही. शिवाय प्रशासनाने मागितलेली रक्कमही मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची आणि पालकमंत्र्यांची कुवत असेल तर पंचनामे करण्यापेक्षा जिल्ह्यात निधी आणून दाखवावा, असे थेट आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 49 लाख 60 हजार रुपये मिळाले-
गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्या आठ कोटीचा पंचनाम्या पैकी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला 49 लाख 60 हजार रुपये मिळाले, मग आता सत्ताधारी पालक मंत्री आमदार खासदार हे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. मग जे पंचनामे गेल्यावर्षी पंचनामे केले त्याची ती रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आताचे आदेश व पंचनामे व नुकसानीचे पाहणी दौरे हे फोटोसेशन पुरतेच आहेत का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी आमदार-खासदार यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठवली. या सरकारकडून काही अपेक्षा ठेवू शकत नाही.