सिंधुदुर्ग - आम्ही ठाकरेंचं ऐकलं नाही तर केसरकर तुमचं काय ऐकणार. दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी आपल्या औकातीत रहाव, आम्हाला नखं लावाल तर फाडून टाकू, असा इशारा भाजपाचे युवा नेते निलेश राणे ( BJP youth leader Nilesh Rane ) यांनी दिला आहे. दरम्यान केसरकर यांचा वरचा मजला रिकामा आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते एक वेळ ठाकरेंच्या विरोधात बोलतात, तर काही वेळाने त्यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे त्यांनी औकातीत राहून बोलावे, असा टोलाही निलेश राणेंनी लगावला आहे.
'...त्यांच्या डोक्याचा वरचा मजला रिकामा' : निलेश राणे यांनी सकाळी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आमदार केसरकर यांच्यावर टीका केली होती. यावेळी आमच्या सोबत काम करायचे आहे, असे सांगणाऱ्या केसरकारांसाठी आपल्या ड्रायव्हरची जागा १ तारीखपासून रिकामी आहे. त्या ठिकाणी तुम्ही या, असा सल्ला दिला होता. परंतु काही वेळाने त्यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करत असताना आपण कोणीतरी मोठे झाल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या डोक्याचा वरचा मजला रिकामी झाला आहे. त्यांना मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते एक वेळ ठाकरेंच्या विरोधात बोलतात आणि काही वेळाने त्यांच्या बाजूला बोलतात. त्यामुळे त्यांना नेमके काय बोलायचे आहे, तेच कळत नाही, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.