सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी आणि पाळये परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी बागायतीचे मोठे नुकसान झाले असून, हजारो केळी जमीनदोस्त झाल्या आहेत.
दोडामार्ग तालुक्यात अवेळी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घोटगेवाडीतील एकाच ठिकाणी दहा हजार केळी जमीनदोस्त झाल्या. शिवाय आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या केळी, पोफळी, काजू , आंब्या फणसाची झाडेही मोडून-उन्मळून पडली. पाळये तिठ्याजवळही अनेकांचे नुकसान झाले. तर, नुकसानीचा आकडा पन्नास लाखांच्या पुढे गेला आहे.
तालुक्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी नुसता शिडकावा झाला. ढगांचा गडगडाट आणि वादळी वारेही वाहत होते. घोटगेवाडी, पाळये परिसरात सोसाट्याचा वारा सुटला, त्यामुळे भटवाडी येथील के. बिजू , मिलिंद आणि नितीन मणेरीकर, संतोष मोर्ये यांच्या जवळपास दहा ते अकरा हजार केळी जमीनदोस्त झाल्या. तसेच माजी सरपंच प्रेमानंद कदम यांच्या सुमारे तीनशे केळी, शेटकर यांच्या दोनशेहून अधिक केळी, पाळये तिठ्यावरील मायकल लोबो यांच्या अडीचशे केळी जमीनदोस्त झाल्या. शिवाय अनेक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.
बिजू यांनी आपल्या केळी बागेत लाखो रुपये खर्च करुन स्प्रिंकल बसवले होते, तेही मोडले. विशेष म्हणजे या बागेतील कामगार जीवाच्या भीतीने झोपडीतील टेबल आणि कॉटखाली लपून बसले होते. वादळी वाऱ्यामुळे शेती बागायतीच्या नुकसानीचा आकडा पन्नास लाखांच्या पुढे गेला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर, दुसरीकडे आसमानी संकट त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.