महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वपक्षीय 'जेलभरो'त स्वाभिमान होणार सहभागी; जिल्ह्यात मनाई आदेश लागू

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. चौपदरीकरणासाठी जमीन गेलेल्या काही लोकांना अजूनही मोबदला मिळालेला नाही, असे स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सावंत म्हणाले.

पत्रकार परिषद

By

Published : Jul 13, 2019, 8:06 AM IST

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्यांविरोधात १६ जुलैला कुडाळ येथे सर्वपक्षीय जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही सक्रीय सहभागी होणार आहे. मात्र, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना दत्ता सामंत

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या "तोंडाने सांगून अधिकारी काम करत नसतील, तर तोंडात मारून काम करून घ्या" या वाक्याचा संदर्भ देत नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेक आंदोलनाचे समर्थन केले. तर केवळ ठेकेदाराची बाजू दडपण्यासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचा आरोपही सामंत यांनी केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, संध्या तेरसे, श्रेया सावंत, डॉ. अमोल तेली, मनीष दळवी आदी उपस्थित होते.

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. चौपदरीकरणासाठी जमीन गेलेल्या काही लोकांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. गेल्या वर्षभरात महामार्गावर ५७ जणांचा मृत्यू झाला. याबाबत आमदार नितेश राणे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठविला. जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांनी महामार्गाच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार महामार्गाच्या कामात सुधारणा करू शकले नाहीत. त्यामुळेच पालकमंत्र्यांचे विश्वासू सहकारी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी नितेश राणेंच्या आंदोलनाला पाठींबा दिला, असा टोलाही त्यांनी पालकमंत्री दिपक केसरकरांना लगावला. दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ जुलैपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी काढले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details