सिंधुदुर्ग- मुंबईच्या दिशेने जाणार्या नेत्रावती एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा दलाने ८६ हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी अचानक सुरक्षा दलाने तपास मोहीम राबवली. तपासात ट्रेनमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूच्या ५६२ बाटल्या रेल्वे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.
नेत्रावती एक्सप्रेसमधून ८६ हजार रुपयांची दारू जप्त
मुंबईच्या दिशेने जाणार्या नेत्रावती एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा दलाने ८६ हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक अरूण लोट व हवालदार शहाजी पवार यांनी नेत्रावती एक्सेप्रेसमध्ये तपासणी मोहीम राबवली. त्यांनी कुडाळ स्थानकावरून सकाळी ८ वाजता तपासणी मोहिमेस सुरूवात केली. यादरम्यान नेत्रावती एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोचच्या सीटखाली ७ बॅग लपून ठेवल्याचे आढळून आले. याविषयी प्रवाशांकडे विचारणा केली असता ती बॅग बेवारस असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तत्काळ या सातही बॅगची झडती घेण्यात आली. त्यावेळी यात गोवा बनावटीची दारू सापडली. या मद्यसाठ्यात वेग-वेगळ्या कंपनीच्या ७५०, १८०, ९० मिलीच्या सुमारे ४०० बाटल्या, असा मुद्देमाल होता.
हा सर्व मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी जप्त करून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरवला. तेथून हा माल डबल डेकर ट्रेनमधून कणकवली स्थानकावर पाठवण्यात आला. तेथून सदर मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या ताब्यात देण्यात आला.